मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेछ्या ....

आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.

दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"

आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"

कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.

रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
आजचा दिवस बलिदानाचा दिवस. महाराष्ट्रात अस एक घर उरल नव्हत जिथे कोणी आपले प्राण दिले नसतील. अखंड महाराष्ट्र ज्वालांनी वेढला. दत्ताजी शिंदे आणि मराठयांची कत्तल झाली. महाराष्ट्रावर आणि मराठी सत्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट मराठयांच्या रक्ताने माखुन गेला.

परकिय सत्तेपासून भारत भूमीचे रक्षण करताना मराठी लोकांनी दिलेले बलिदान आज देश विसरुन गेलाय. पानिपत हा तर काही लोकांना विनोदाचा विषय वाटतो. पण लक्ष्यात असु द्या महाराष्ट्रात जेव्हा निर्भयपणे आपले पुर्वज सक्रांत साजरी करत होते तेव्हा लक्ष मराठी सेना आपल रक्षण करण्यासाठी उत्तरेत अब्दालीशी दोन हात करत होती.

चला आपण सर्वांनी आजच्या दिवशी संकल्प करुया,
पानीपतच्या बलिदानाचे गांभीर्य आम्ही आजन्म-आमरण स्मृतीपटलावर ठेऊ आणि हा विषय विनोदाचा होणार नाही याची दक्षता घेऊ.


No comments: